गोंदिया: दिवाळी संपताच शहरातील लोकांमध्ये तुळशी विवाहाच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. कार्तिकी द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाहाची धामधूम शहरभर पाहायला मिळत आहे. श्रीकृष्ण-तुलसी विवाहानिमित्त घरातील तुळशी वृंदावनाचे सजावट आणि रंगरंगोटी करण्यात आली आहे.
तुळशी आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. पंचामृत आणि गंगाजलाने तुलसीचे मंगलस्नान घालून तुलसीजवळ विवाहाचे वाण ठेवण्यात आले. या वाणाने तुलसीची ओटी भरण्यात आली. यानंतर मंगलाष्टकांमधून शुभ मंगल सावधानच्या जयघोषात आंतरपाट धरून श्रीकृष्ण-तुलसी विवाह सोहळा पार पडला.
शहरातील आदर्श कॉलनीमध्ये गुरुवारी श्रीकृष्ण-तुलसी विवाह अत्यंत थाटामाटात साजरा करण्यात आला. कॉलनीतील बहुसंख्य नागरिक या उत्सवात सहभागी झाले होते. फटाक्यांची आतषबाजी आणि मंगलाष्टकांच्या स्वरात साजरा झालेला हा विवाह सोहळा आनंदाने भरून गेला.या विवाहानंतर अनेक ठिकाणी शुभ कार्यांची सुरुवात होणार आहे.